top of page

डोकॅलिटी वापरणारी माणसं


दिमाख की बत्ती जला दे अशी एका नामांकीत उत्पादनाची जाहीरात टीव्ही वर आपण अनेकदा पाहिली असेल. जाहीरातीचा संदर्भ जरावेळ बाजूला ठेवला तर दिमाख की बत्ती जला दे या वाक्यात दडलेला अर्थ कल्पनाशक्तीच्या बाबतीत किती चोख ठरतो ते आपल्याला जाणवेल. दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण आली तरी त्यावर तोडगा काढणारी किमान एक तरी व्यक्ती बहुतांश घरात असते. त्यांच्यात आणि आपल्यात नेमका काय आणि कसला फरक असतो असा विचार करून पहा. हा फरक असतो डोकॅलिटीचा. डोकॅलिटी म्हणजे .. डोक्याची बिलीटी. अर्थात, नव्याने, कल्पकतेने विचार करण्याची शक्ती. आपल्यापैकी सगळ्याच माणसांमध्ये ही शक्ती असते पण त्या क्तीचा वापर करून कृती करणारी माणसं विशेषत्वाने उठून दिसतात. किंबहुना प्रत्येकच जण प्रत्येक वेळी कल्पनाशक्ती वापरू शकेलच असे नसले तरीही प्रत्येकजण किमान काही ठिकाणी आपल्यातील कल्पनाशक्तीचा वापर करत असतोच. कल्पनाशक्तीच्या दुनियेत वावरणारी माणसं नेहमीच आपल्या कल्पनाशक्तीचा कुठे आणि कसा वापर करता येईल याची संधी शोधत असतात. म्हणूनच कित्येकदा अशी माणसं इतरांपेक्षा वेगळी उठून दिसतात. संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, अभिनय अशा विविध कलांच्या माध्यमाद्वारे कल्पनाशक्तीचा आविष्कार एरवी आपण सगळे पहात असतोच. मात्र रोजच्या व्यवहारात देखील कल्पनाशक्तीचा वापर अनेकदा अनेकजण करत असतात. ही मंडळी म्हणजे माझ्या भाषेत डोकॅलिटी वापरणारी माणसं. यांचं भन्नाट, सुपीक डोकं कधी आणिकसं चालेल याची कल्पना कुणी करू शकत नाही. हॉवर्ड गार्डनर (1993) यांनी सेव्हन क्रीएटर्स ऑफ द मॉडर्न एरा या पुस्तकात कल्पनाशक्तीविषयीचा बिग सी लिटल सी हा सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते, कल्पनाशक्तीचे दोन प्रकार आहेत. विविध कलांच्या माध्यमातून किंवा निसर्गतःच ज्या माध्यमातून कल्पनाशक्ती झळकत असते अशा कल्पनाशक्तीला त्यांनी बिग सी म्हटले, त्तर कलांखेरीज अन्य माध्यमातून वापरल्या जाणा-या कल्पनाशक्तीला लिटल सी असे त्यांनी संबोधले.

शिक्षण घेऊन, वर्षानुवर्षे सराव करून बिग सी विकसीत करता येतो.उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीमध्ये उपजतच नृत्याचे अंग असते. वेळोवेळी ते दिसून येते. ती व्यक्ती आपल्यातील या कलेचे शिक्षण घेते, दीर्घकाळपर्यंत नृत्याचे शिक्षण घेत ती व्यक्ती नृत्यामध्ये प्रावीण्य मिळवते. आपल्यातील कलाकाराचा शोध घेते. त्यासाठी अशा प्रत्येक व्यक्तीला स्वत्वाचा शोध घ्यावा लागतो. स्वतःच्या अंतरमनाशी सतत संवाद साधत रहावा लागतो. तसे केल्यानंतरच त्यांच्या कला अभिव्यक्तीत वैविध्य आणणे कलाकाराला शक्य होते. उपजत कलेला सातत्य, मेहनत, सराव, आत्मविश्वास या गुणांची जोड देऊन कलाकार घडतो. मात्र खरोखरच हे सारे सामान्य माणसासाठी कठीण असते. एखाद्याच्या अंगात एखादी कला असली तरीही कलाकार म्हणून घडणे त्याला वा तिला जमतेच असे नाही.

प्रत्येकच व्यक्ती कलाकार होऊ शकत नसली तरीही प्रत्येकव्यक्तीमध्ये कल्पनाशक्ती असते हे मात्र नक्की. त्यामुळेच प्रत्येकाची कल्पनाशक्ती अनेकदा अनेक प्रसंगांच्या माध्यमातून दिसून येत असते. साधं सोपं उदाहरण घेऊया. भारतामध्ये प्रत्येक घरात दररोज स्वयंपाक बनवला जातो. बहुतेकदा आई किंवा घरातील प्रमुख स्त्री या स्वयंपाकाची जबाबदारी उचलते. या स्वयंपाकात दररोज विविध चवींचा समावेश करण्याची कल्पकता प्रत्येकच स्त्री दाखवते मात्र यापुढे जाऊन शिजवलेल्या अन्नाला सुशोभित करण्याचे कौशल्य एखादी स्त्री विकसीत करते, त्याचा दैनंदिन जीवनात अवलंब करते हा झाला लिटल सी.

जागतिक पातळीवर या बिग सी, लिटल सी ला खूप महत्व आहे. याचे कारण मानवी भावभावनांचा होणारा जागतिक पातळीवरील विचार. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा यांपलिकडे जाऊन विविध साधनं, चैनीच्या वस्तू कालपरत्वे तयार होत गेल्या. परंतु तरीही समस्त मनुष्यजात केवळ या सा-याच्या उपयोगाने आनंदी झाल्याचे आज दिसून येत नाही. त्यामुळेच मानवी भावभावनांशी निगडीत विचार मोठ्या प्रमाणावर होताना दिसू लागला आहे. कल्पनाशक्तीचा वापर करून हा आनंद निश्चितच व्दिगुणीत करता येऊ शकतो. याबाबतचा अधिक विचार पुढील स्तंभात करूया ..


121 views0 comments

Comments


bottom of page